वासोटा – जंगल प्रवास
नैसर्गिक दुर्गमता लाभलेला, जावळीच्या निर्भीड अरण्यात असलेला, शिवसागर जलाशयाच्या मागे सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असलेला वासोटा किल्ला म्हणजे सह्याद्रीतील दुर्गरत्न. पूर्वेला घनदाट अरण्य व पश्चिमेला कोकणात कोसळणारे सह्याद्रीतील बेलाग उंच कडे यामुळे वासोटा गिर्यारोहकांना नेहमीच भुरळ पाडतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे नाव व्याघ्रगड असे ठेवले. निर्जन व घनदाट अरण्य यामुळे पूर्वी येथे वाघांची संख्या अधिकच होती. स्वराज्यात या किल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे.
वासोट्याला जाण्यासाठी पुण्यावरून सातारा बामणोली असा प्रवास करावा लागतो. इथून पुढे बामणोली ते मेट इंदवली हा बोटीचा प्रवास खूपच रोमंचकारी व अविस्मरणीय ठरतो. मेट इंदवलीवरून घनदाट अरण्यातून पायी प्रवास सुरु होतो.
मेट इंदवलीला वनखात्याचे ऑफिस आहे. याठिकाणी गडावर जाण्यासाठी परवानगी काढावी लागते.