पन्हाळा ते पावनखिंड
सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा दिला आणि महाराज पन्हाळ्यात अडकले. नवे अस्मानी संकट स्वराज्यावर चालून आले. अफजलखानाच्या वेळी नियोजन करण्यास वेळ तरी होता. इथं मात्र स्वतः महाराजच वेढ्यात अडकले होते. सुटका होणे मुश्कीलच होते. सिद्दी जौहर म्हणजे कोणी सामान्य असामी नव्हे तर तो क्रूर, बुद्धिमान असा कसलेला सेनानी होता. त्याच्या अफाट सैन्याने पन्हाळ्याला वेढलेले होते. बाहेर पडायचं तर सरळ सरळ दोन हात करणे आणि असं करणे म्हणजे साक्षात मृत्यूला आव्हानचं.
पण महाराज म्हणजे साक्षात संकटाना पाठीवर घेऊनच स्वराज्य स्थापनेसाठी सज्ज झालेले असामान्य योद्धे. त्यांचे प्रत्येक डावपेच वेगळे. संकट भयंकर होते. पण यातून सहीसलात बाहेर पडायचं, असा महाराजांचा दृढ निश्चय. दिवसामागून दिवस सरत होते. योजना तयार होत होती.
अन अशातच पावसाळा सुरु झाला. आषाढ पौर्णिमेची रात्र, काळ्याकुट्ट ढगांनी दाटलेली. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी चिन्ह. ढगांच्या गडगडाटानी काळीज फाटत होते तर विजांच्या कडकडाटांनी आभाळ. इतक्यात महाराजांनी आपल्या निवडक मावळ्यासंह पन्हाळा सोडला. काही वेळातच धो धो पाऊस कोसळू लागला. सगळीकडे चिखलगाळ, किर्रर्र झाडी, तुडुंब भरून वाहणारे ओढे, नाले, ओलांडून मावळे धावत होते. पाठीमागून गनीम त्यापेक्षा वेगाने चालून येत होता. मसाईच पठार, चाफेवाडी, पाटेवाडी, पांढरपाणी मागे पडले. २१ तासांचा हा पाठशिवणीचा खेल व शेवटी घोडखिंडीतील अद्वितीय रणसंग्राम. अखेर महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचले. शूर मावळ्यांच्या शौर्य बलिदानाने पावन झालेली घोडखिंड इतिहासात पावनखिंड या नावाने प्रसिद्ध झाली.
आशय दैदिप्यमान इतिहास व स्थळांचा घेतलेला आढावा.