दुर्गवारी – गेली २० वर्षांपासून महाराष्ट्रात भटकंती करत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील असंख्य गडकिल्ले, लेणी, तीर्थक्षेत्रे, घाट रस्ते, डोंगरवाटा असंख्यवेळा तुडवल्या आहेत. सह्याद्रीतील हि दुर्गरत्ने, नैसर्गिक सौंदर्यस्थळे अनेक वर्षे पाहून झाल्यावर महाराष्ट्राचा हा अनमोल खजिना जगालाही कळला पाहिजे. त्यांनाही तो अनुभवता आला पाहिजे, या विचारातून मग फोटो, व्हिडीओ यांच्या रूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आपल्यासमोर आणायचे ठरवले परंतु त्याला एक विशेष नाव असणे गरजेचे होते. मग प्रवास सुरु झाला तो दुर्गवारी या नावाचा.
असंख्य नावांचा यासाठी विचार केला गेला. यात प्रामुख्याने भटकंती,
भ्रमंती, फिरस्ते, महाराष्ट्र देशा, दुर्गांच्या देशा, सफरनामा, दुर्ग भरारी, दुर्गवेडे, सह्याद्रीप्रेमी यापैकी एखादे नाव असावे असे वाटत होते. परंतु हि नावे यापूर्वीच अनेक ठिकाणी वापरलेली आहेत. म्हणून मग एक आगळंवेगळं नाव जे फारस कोणी वापरलं नाही अशा नावाचा विचार केला गेला.
पंढरीची वारीतील वारी या शब्दाला विशेष महत्व आहे. आपणही सह्याद्रीची नेहमी वारी करत असतो मग नावात वारी असणे खूप आवश्यक वाटू लागले. सह्याद्रीची वारी, सह्यभटकंती, अशी नावे फारशी जवळची वाटत नव्हती. शेवटी गडकिल्ले हे जास्तीत जास्त या वारीत येत असल्यामुळे दुर्गवारी हे नाव सर्व मित्रांच्या सल्याने पक्के ठरले. त्यात हि सोशल मीडियाच्या माध्यमात कोणी वापरले नव्हते.