सफर प्राचीन नाणेघाटाची !
ऑक्टोबर महिना, मी आणि सर्जेराव मोरोशीच्या भैरवगडासाठी निघालो. चार वेळा नियोजन करूनही बेत फसला होता. यावेळी मात्र बेत पक्का होता. पुणे नाशिक हायवेने आमचा प्रवास सुरु झाला.
परतीचा पाऊस अक्षरशः कोसळायला लागला होता. एवढ्यात कमळू दादाचा फोन आला आणि मनात शंकेची पाल चुकचुकली.
पुन्हा एकदा भैरवगडाचा बेत रद्द झाला. पण यावेळी आम्ही माघारी फिरणार नव्हतोच. आम्ही नाणेघाट – जीवधनचा बेत केला.
सायंकाळचे पाच वाजून गेले होते. रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. प्रवास करणे अवघड जात होते, परंतु हळूहळू का होईना आम्ही जुन्नरच्या दिशेने जात होतो.
खेडचा घाट ओलांडला आणि पावसाचा जोर कमी झाला. नारायणगाव वरून जुन्नरकडे वळालो आणि पुन्हा पावसाने जोर धरला
परंतु पुढे काही अंतरापर्यंतच हा जोर राहिला.दाट काळोख आणि रिमझिम पाऊस अशा वातावरणात आम्ही जुन्नरच्या वेशीत प्रवेश केला. यापूर्वी नाणेघाट केला होता त्यामुळे त्या परिसराची माहिती होतीच म्हणूनच रात्री प्रवास करणे टाळावे असे ठरले.
परंतु रमेश खरमाळे जे जुन्नर मधील माजी सैनिक व निसर्गप्रेमी आहे यांच्याशी बोलणं झाल्यावर त्यांनी चहासाठी निमंत्रण दिले.
चहा पीत असताना जुन्नरच्या अनेक ऐतिहासिक, नैसर्गिक साधन संपत्तीवर चर्चा रंगली व त्यांच्या सल्ल्याने नाणेघाटाचा रस्ता धरला.
जुन्नर मागे पडले आणि हळूहळू निर्जन व अरुंद रस्त्याचा मार्ग लागला.
दाटलेल्या अंधारात गाडीच्या उजेडात फक्त रस्ता दिसत होता. अचानकच वीज कडाडली आणि अंगावर शहारा उभा राहिला. वाटेत हा खेळ सुरूच होता. आपण नक्की कुठं पोहचलोय हे कळायला मार्ग नव्हता.
आणि पुन्हा अचानक वीज कडाडली. त्या लखलखत्या प्रकाशात चावंड किल्ला उजळून निघाला होता.
रस्ता अरुंद जरी होता तरी येणारे एकही वाहन नसल्यामुळे प्रवास करण्यास अडचण येत नव्हती.
जुन्नर ते नाणेघाट हे २८ किमीचे अंतर कापायला पाऊणतास लागतोच. प्राचीन व ऐतिहासिक असलेला हा घाट पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येत असतात.
तो दिवस भाद्रपद अमावसेचा होता. त्यामुळे सगळीकडेच संपूर्णतः काळोख पसरलेला होता.
आम्ही नाणेघाटाच्या अगदी जवळ पोहचलो. रस्त्यात दगडी लावलेल्या होत्या त्यामुळे पुढे जाणे शक्यच नव्हते. मुळात पुढे प्राचीन नाणेघाटाची सुरुवात होते.
आम्ही काहीवेळ थांबून रमेश सरांना संपर्क साधला. सुदैवाने त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने जीवधन किल्याच्या दिशेने निघालो. गाडीचा वेग अगदी कमी होता कारण गडद काळोखात दरीचा अंदाज येत नव्हता.
विजेच्या कडकडाटात आम्हाला जीवधन किल्याचे दर्शन झाले.
काही अंतर आल्यावर एका घराशेजारी थांबून चौकशी केली आणि आम्ही योग्य ठिकाणी पोहचलो याची खात्री झाली.
रात्रीचे नऊ वाजले होते. सुभाष दादांनी पर्याय दिले. खोली मिळेल अथवा गाडीतही राहू शकता.
आम्हाला गाडीत काहीच अडचण नव्हती परंतु आम्ही खोलीचा पर्याय निवडला.
सोबत आणलेला डबा सोडला व जेवण करून झोपी गेलो.
दुसऱ्या दिवसाची सकाळ खूपच प्रसन्न होती. सकाळचा चहा घेऊन आम्ही नाणेघाट व त्यांनतर जीवधन करायचे ठरवले.
सर्जेराव व मी नाणेघाटात पोहचलो. प्राचीन व ऐतिहासिक असा नाणेघाट सकाळच्या वातावरणात न्याहाळण्यात खरी मजा होती. कारण तिथं अजिबात गर्दी नव्हती.
सुमारे सव्वा दोन हजार वर्षे प्राचीन असलेला हा घाट कल्याण ते प्रतिष्ठान या राजमार्गावर खोदला गेला आहे.
प्रतिष्ठान हि सातवाहनांची राजधानी होती. सातवाहन कुल हे महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे. त्यांचे राज्य हे इ.स. पूर्व अडीचशे वर्ष ते इ.स.नंतर अडीचशे वर्ष असे जवळजवळ पाचशे वर्षे होते.
डांबरी रस्ता संपल्यावर नळीच्या तोंडाशी असलेल्या एका भल्या मोठ्या रांजणाजवळ आम्ही पोहचलो.
पूर्वी हा रांजण जकातीसाठी वापरला जायचा. कल्याण बंदरात उतरलेला माल नाणेघाटातून पुढे प्रतिष्ठाण (पैठण) इथं नेण्यात येत असे.
तेव्हा या ठिकाणी व्यापाऱ्याकडून जकात स्वरूपात नाणी स्विकारली जायची. हि नाणी गोळा करण्यासाठी असे रांजण उपयोगात यायचे.
रांजण व बाजूचा परिसर पाहून आम्ही घाट उतरून गुहेजवळ आलो.
बाजूने झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्याचा मंजुळ आवाज कानावर पडत होता.
खाली उतरणीवर कोकणचा विस्तीर्ण प्रदेश दिसत होता.
गुहेला लोखंडी जाळीचा लाकडी दरवाजा बसवलेला आहे. कातळात कोरलेली प्रशस्त अशी हि गुहा ऐसपैस आहे. गुहेच्या तिन्ही बाजूला ब्राम्ही लिपीतील लेख कोरलेले आहेत.
या गुहेत साधारण ४०-५० जण सहज राहू शकतात. घाटातील हि एकमेव जागा आहे जिथं विसावा घेता येतो किंवा थांबता येते.
गुहेच्या बाहेर पाण्याचे कुंड आढळतात.
गुहेच्या समोरील कातळात एक छोटी गुहा व पाण्याचे काही टाके आहेत.
नाणेघाटाची लांबी हि सुमारे ३ मैल आहे तर नळी हि सुमारे २५० मीटर लांब व ८ मीटर रुंद आहे.सर्जेराव व मी या नळीने १०० – मीटर उतरून खाली गेलो. वेड्या वाकड्या वळणाचा हा प्रशस्त मार्ग आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आपले अस्तित्व टिकवून आहे.
पुन्हा आम्ही माघारी फिरून नाणेघाटातील पठारावर आलो. विस्तीर्ण असे हे पठार आहे. उजवीकडे वळून आम्ही चालू लागलो. वाटेत एका ठिकाणी काही दगडात कोरलेल्या पायऱ्या आढळल्या. या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला एका छोट्या गुहेत गणपती व त्याच्याच पुढच्या बाजूला काही पाण्याची टाकी आढळली.
हे सर्व पाहून आम्ही उंच माथ्यावर आलो. या भागाला नानाचा अंगठा म्हणतात.
नाणेघाट पाहायला साधारण अर्धा तास लागतो. या ठिकाणी एक दगडी रांजण, नाणेघाटाची दगडी वाट, गुहा, गुहेत कोरलेले लेख, पाण्याची टाकी, लेणी, गणपती व नानाचा अंगठा अशा बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.
तसेच इथून जवळच जीवधन हा किल्ला देखील पाहता पाहता येतो. इथून कोकणचा परिसर, ढाकोबा, जीवधन, भैरवगड, हरिश्चंद्रगड हे किल्ले सहज दिसतात.
नाणेघाटला यायचे झाल्यास प्रथम जुन्नर या ठिकाणी यावे. चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून डावीकडे शिवनेरी किल्यावर एक रस्ता जातो व सरळ येणारा रस्ता नाणेघाटात येतो.
मुंबई, कल्याण मार्गे आल्यास माळशेज घाटाला सुरुवात होण्यापूर्वी वैशाखरे गावापासून पुढे २ किमी वर असलेल्या नाणेघाट या फलकाजवळ उतरून तिथून येणाऱ्या वाटेने नाणेघाट करता येतो.
नानाचा अंगठा उतरून आम्ही जीवधनची वाट धरली.
क्रमशः